“डॅा रामचंद्र दत्तात्रय लेलेःआधुनिक धन्वंतरी!”
एम डी नंतरचा तो काळ होता, काही तरी “कर गुजरने”की तमन्ना होती,शायरचे शब्द वापरायचे तर म्हणतात कि”मोहोब्बत से मोहोब्बत थी”! अशाच एका दिवशी ट्रेन नी मुंबईला व्हीटी ला जाऊन पोहोचलो फेब्रुवारी- मार्च महिना असावा. माझा काका, वडलांचा मावसभाऊ तेव्हा महिंद्र ॲंड महिंद्र मध्ये मोठ्ठा अधिकारी होता व चक्क पेडररोडला
”सनबीम”अपार्टमेंट ला रहात असे. शेजारीच मंगेशकरांनी वलयांकित असं प्रभुकुंज, कोपर्यावर कॅडबरीची इमारत( जाता येतां कधी चॅाकलेटचा वास येतो कां म्हणून मी कानोसा घेत असे) रस्त्यावर अखंड वर्दळ व एकंदरीत उल्हास व उत्साही वातावरण! अशाच ऐका दिवशी मी लेलेसरांकडे जाऊन उभा ठाकलो. काय? कुठला? वगैरे जातकुळीची तपासणी झाल्यावर “उद्यापासनं सकाळी ये !” असं म्हटले. डॅा सुरेश कर्णिक , चीफ ॲाफ लेबोरेटरीज, डॅा दिलीपकुमार चीफ ॲाफ रेडिएशन वगैरे मंडळींची आजूबाजूस ॲाफिसेस होती. सरांकडे कोणी एक डॅा कामदार म्हणून रेसिडेंट अन् जाधव म्हणून तंत्रज्ञ होता.त्यांच्यात माझी पण जिम्मा झाली! आधीचं शिक्षण ओस्मानिया विश्वविद्यालयात व नंतर मुंबईच्या ग्रॅंट मेडिकलला ,सर जीएमसी नागपूरला पण प्रोफेसर व हेड म्हणून काही काळ होते
सर वेळेचे व शब्दाचे एकदम पक्के! नेहेमी अत्यंत टापटीपीत व उत्तम रंगसंगती साधलेले कपडे कधी सुट तर कधी सफारी ते देखील टेलर्ड … म्हणजे बरहुकूम बेतून शिवलेले! त्यांतहि सर एकाच ठाणामधल्या कापडातून पॅंट व कोट अन् सफारीचा टॅाप शिवून घेत म्हणजे मिटींग्ज न कधी कोट टाय तर कधी सफारी असं कॅांबीनेशन ते करीत व विविधता आणीत असत.हे मला १९८४ च्या एपीआय बंगलोरच्या कॅान्फरन्सला ध्यानात आलं !
डीप नेव्ही ब्लू रंग.. सरांचा लाडका व त्यासोबत ते अगदी ब्लड रेड रंगाचा शॅाकींग टाय लावत! सुसुत्रता व वैविध्य असा त्यांचा पेहराव असे ! उंचपूर व सडसडीत गोरे,चष्म्या पल्याडून तुम्हाला अंतर्बाह्य निरखणारे जरा मिष्किल डोळे व देखणा व अतिशय मुलायम असा सरांच्या हाताचा पंजा होता व बोटं अगदी लांब व सडसडीत! जशी कोणा कलावंताची असावी अशी! ख्यातनाम उद्योगपती गोगटे (बेळगाव) सरांचे स्नेही ते देखील कधी येऊन गेले त्यांचा स्कॅन आम्ही त्यांच्या सोईनुसार रविवारी केला होता.तसंच पं रविशंकरांनी संगीत दिलेल्या “अनुराधा” सिनेमाची नितांतसुंदर नायिका लीला नायडू व अभिनेत्री नूतन यांचे स्कॅन पण माझ्या कालावधीत झाले होते! कोणाचं “ॲास्टीओमायलायटीस”चं निदान पण सरांनी सर्व प्रथम बोन स्कॅन द्वारा केलं होतं , हे १९८५ साली अगदी नवीन होतं. जसलोकच्या क्लिनिकल मिटींग्ज ना सर स्वतः केसेस सादर करत तेव्हा कोणा डॅा नरूलां सोबत सरांची मजेदार नोकझोक पण कधी बघायला मिळे! सर कोणा व्हीआयपी साठी कधी रविवारी पण बोलवायचे पण त्याचा रोख मोबदला ते लगेच देत असत.सरांच्या मेजावर “ग्रंथ संपदा” असे ज्यात काही मराठी व संस्कृत ग्रंथ पण असत, पुलं च्या “तुझे आहे तुजपाशी” चा काकाजी वर सरांचा विषेश लोभ, “ चुकलं तर चुकलं म्हणा” हे काकाजीच्या तोंडचं प्रसिध्द वाक्य सर बरेचदा सांगत! क्लिनिकल मिटींगला स्लाईड चेंज करतांना आपण “नेक्स्ट स्लाईड” म्हणतो जे सरांना रुचत नसे, तर त्याकरता सर “टिकटीकी” चा वापर करीत.
सुमारे साडेचार महिने लोटले व मला एकसुरी पणाचा कंटाळा येऊ लागला, जे सरांच्या लक्षात आलं. तेव्हा,’आता काय करणारैस?’असं विचारलं. मी जरा धीट पणे मला तुमचा ज्युनियर म्हणून घ्याल कां? असं विचारलं! सर म्हटले ,” Beta you are little late. My son Vikram is coming and joining me in next few months!” मग काय ? मी जसलोकला रामराम केला व टाटा मेमोरियल ला डॅा सुरेश अडवानींकडे रूजू झालो.आज जवळ जवळ साडे तीन दशकं उलटली तरी सरांची ती
सुमारे सव्वासहा फूट उंचपूर सडसडीत , भव्य कपाळ सरळ नासिका व मिश्किल डोळे असलेली बुध्दिवंत व प्रज्ञावंताची मुर्ती
कधी डोळ्यांसमोर येते, मान लवते व मनोमन हात जोडले जातात. सर दृष्टी आड जरी झाले व आज पडद्या आड झाले सरांची आठवण नेहेमीच येईल व हात जोडले जातील…
“दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती” सरांना विनम्र श्रध्दांजली!!
सदानंद करंदीकर
२५-६-२०२२